वीज बचतीसाठी महापालिकेचा पुढाकार950 पैकी 64 मिळकतींवर सोलर पॅनल : वार्षिक 1 कोटी 41 लाख रुपयांची बचत होणार
950 पैकी 64 मिळकतींवर सोलर पॅनल : वार्षिक 1 कोटी 41 लाख रुपयांची बचत होणार
पिंपरी – राज्यभरासह शहरात महावितरणच्या अघोषित भारनियमनाला नागरिक वैतागले आहेत. मात्र, महावितरणच्या वीजेसाठी नवीन पर्याय शोधणेही तितकेच गरजेचे आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने वीज बचत आणि वीजेला पर्याय म्हणून पालिकेच्या 64 मिळकतींवर सोलर पॅनल बसविले आहे. हे सर्व सोलर पॅनल सद्यस्थितीत कार्यरत आहेत. यामधून दररोज 4 हजार 240 युनिट वीज निर्मिती होत आहे. त्यामुळे महापालिकेची वार्षिक 1 कोटी 41 लाख रूपयांची बचत होत आहे.
शहरात महापालिकेच्या 950 मिळकती आहेत. यामधील 64 मिळकतींवर सोलर पॅनल लावले आहे. यामध्ये निगडीतील जलशुध्दीकरण प्रकल्प येथे 314 किलो व्हॉट, महापालिकेची मुख्य इमारतीवर 170 किलो व्हॉट, वायसीएम रूग्णालयच्या इमारतीवर 147 किलो व्हॉट, भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहच्या इमारतीवर 136 किलो व्हॉट या चार ठिकाणी मोठे सोलर पॅनल लावण्यात आले आहेत. उर्वरित शाळा, रूग्णालय, क्षेत्रीय कार्यालये, तालीम, अग्नीशामक केंद्र अशा विविध 60 मिळकतींवर 2 पासून 18 किलो व्हॉटचे सोलर पॅनल लावले आहेत. या सर्व पॅनलव्दारे महापालिकेला 1 हजार 116.92 किलोव्हॉट वीज तयार होत आहे. त्यामुळे महापालिकेचे वार्षिक 1 कोटी 41 लाख रूपयांची बचत होत आहे.
सोलर पॅनेल उभारून त्याद्वारे “सोलर फोटो व्होल्टाइक पैनल” द्वारे वीजनिर्मिती केली जाते. सौर वीज निर्मिती यंत्रणा पंचवीस ते तीस वर्षे पूर्णपणे देखभाल विरहित असून यातून अव्याहतपणे वीज मिळत राहते. सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे. विजेची मागणी दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे महावितरणकडून अघोषित भारनियमन सुरू असून शहरी भागातही वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. अशावेळी सोलर पॅनलच्या वीजेचे महत्व लक्षात येते. त्यामुळे सोलर पॅनलव्दारे वीज निर्मिती काळाची गरज असल्याचे दिसून येत आहे.
पथदिवे सौरऊर्जेवर करण्याची गरज
शहरातील विविध भागातील रस्त्यांवर सुमारे 90 हजार स्ट्रीट लाइट पोल आहेत. या पोलमुळे महापालिकेला मोठ्या प्रमाणावर वीज बिल येत आहे. या स्ट्रीट लाईट पोलवर सोलर पॅनल बसविणे गरजेचे आहे. मात्र, पावसाळा आणि हिवाळ्यात जास्त प्रमाणात सोलर कार्यान्वित राहत नाही. तसेच हे पोल रस्त्यामध्ये अथवा कडेला असल्यामुळे या पॅनलवर धूळ बसते. पॅनल नेहमी धूळमुक्त असणे गरजेचे आहे. त्यामुळे स्ट्रीट लाईट पोलवर सोलर पॅनल बसवता येत नसल्याचे विद्युत विभागाचे सह शहर अभियंता संदेश चव्हाण यांनी सांगितले.
महापालिकेच्या 64 मिळकतींवर सोलर पॅनल बसविले आहे. हे सर्व सोलर पॅनल सध्यःस्थितीत कार्यरत आहेत. यामधून दररोज 4 हजार 240 युनिट वीज निर्मिती होत आहे. त्यामुळे महापालिकेची वार्षिक सुमारे दीड कोटी रूपयांची आर्थिक बचत होत आहे.
– संदेश चव्हाण, सह-शहर अभियंता, विद्युत विभाग