पिंपरी – केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून पेट्रोल आणि डिझेलवर तीनशे टक्के आयात शुल्क (एक्साईज ड्युटी) वाढविण्यात आले आहेत. यातून केंद्र शासनाने तब्बल 27 लाख कोटींची नफेखोरी केल्यानंतरही मूग गिळून गप्प बसलेल्या आमदार महेश लांडगे यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची आठवण होणे हास्यास्पद बाब आहे. राज्यातील जनतेचा एवढाच कळवळा असेल तर केंद्राकडे राज्याचे जीएसटीपोटी अडकलेले 26 हजार कोटी रुपये आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा आरोप टोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे.
आमदार तथा भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी पेट्रोल दरवाढीबाबत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना अजित गव्हाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्रामध्ये भाजपाची सत्ता आली तेव्हा पेट्रोल आणि डिझेलवर आयात शुल्क हे प्रतिलिटर 9 रुपये 48 पैसे होते. मात्र भाजप सरकारने गेल्या सात वर्षांत त्यामध्ये 300 टक्के वाढ केल्याने केंद्र सरकार त्यातून प्रति लिटर 32 रुपये 90 पैसे कमवित आहे. याशिवाय इतर करांचा बोजाही केंद्राने पेट्रोल व डिझेलवर लादला आहे. आयात शुल्काच्या माध्यमातून 27 लाख कोटींची नफेखोरी केंद्र सरकारने आतापर्यंत केली आहे. पेट्रोल डिझेलमधूनच नव्हे तर जीएसटीमध्येही भरमसाठ वाढ केली जात आहे.