पुणे –प्रशासक नियुक्तीनंतर पहिल्यांदाच महापालिकेची मुख्यसभा होत आहे. सोमवारी ही मुख्यसभा महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात होणार आहे. मागील सभांच्या विषयासह, शहर सुधारणा समिती आणि स्थायी समितीत घेण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयांना मान्यता दिली जाणार आहे.
महापालिका सदस्यांची मुदत 14 मार्च रोजी संपल्यानंतर पालिका प्रशासनाने स्थायी समितीसह, मुख्यसभा तसेच इतर विषय सभांचे कामकाज प्रचलित पद्धतीनेच करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्रशासक म्हणून आयुक्तांची ही एप्रिल महिन्याची पहिली मुख्यसभा असणार आहे.
प्रशासक नेमणुकीनंतर प्रशासनाने कामकाजाबाबत राज्यशासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. मात्र, शासनाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेने राज्यातील इतर ठिकाणी प्रशासकीय कामकाज कशा पद्धतीने चालते याची माहिती मागविली होती. त्यानंतर अखेर पालिका आयुक्तांनी महापालिकेच्या सर्व समित्यांचे कामकाज पूर्वीप्रमाणेच चालेल, असा निर्णय घेतला होता. त्यानुसार, ही पहिली मुख्यसभा होणार असून नगरसचिव तसेच ज्या विभागांचे विषय मान्यतेसाठी आहेत, ते विभाग प्रमुख या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.