पुणे –देशभरातील ‘आयआयटीसी’ नामांकित केंद्रीय शिक्षण अभियांत्रिकी संस्थांतील प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी “जेईई मेन’ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यंदा ही परीक्षा दोन सत्रांत होणार असून पहिल्या सत्रातील परीक्षा जूनमध्ये, तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा जुलैमध्ये होणार आहे.
देशभरातील विविध राज्यात बारावीची परीक्षा घेणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा करोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीच्या तुलनेत यंदा उशिराने होत आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी देशभरातील विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्याची दखल घेत परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) “जेईई मेन’ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या परीक्षेचे पहिले सत्र 21 एप्रिल ते 4 मे या कालावधीत, तर दुसरे सत्र 24 ते 29 मे या कालावधीत होणार होते. आता सुधारित वेळापत्रकानुसार पहिल्या सत्रातील परीक्षा 20 ते 29 जून दरम्यान होईल. दुसऱ्या सत्रातील परीक्षा 20 ते 29 जुलै दरम्यान होणार आहे.
परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया आता संपली आहे. तसेच दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाईल, असेही एनटीएने स्पष्ट केले आहे.