सातारा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सातारा जिल्ह्याच्या अपेक्षांना जोरदार धक्का बसला. साताऱ्याचा पहिलवान उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत याला गोंदियाच्या वेताळ शेळके याने चार विरुद्ध तीन गुणांनी पराभूत केले. त्यामुळे महाराष्ट्र केसरी मानाची गदा साताऱ्यात आणण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
बुधवारी दिवसभरात पाच वजनी गटात झालेल्या कुस्त्यांच्या फेऱ्यांमध्ये पुणे, सोलापूर, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांनी वर्चस्व राखले. कुस्ती स्पर्धेत सायंकाळच्या सत्रात साताऱ्याचा किरण भगत माती विभागातून आखाड्यात उतरला होता. या कुस्तीसाठी सातारकर कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती.
पहिल्या फेरीत किरण भगतने चपळाईने हालचाल करून शेळके याच्यावर दोन एक अशी बढत घेतली. कुंडी डावाच्या माध्यमातून चितपट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फसल्याने त्याला दोन गुणांवर समाधान मानावे लागले. किरण भगत याचे बऱ्याच कालावधीनंतर झालेले आगमन आणि सराव होऊनही पट काढण्यात आलेले अपयश यामुळे दोन्ही मल्लांना एकमेकांचा अंदाज येत नव्हता.
शेवटच्या दहा सेकंदात वेताळ शेळकेने जोरदार चाल करून दोन गुण मिळवल्याने साताऱ्याच्या किरण भगतला चार विरुद्ध तीन गुणांनी धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. किरणबरोबर अतुल पाटील (जळगाव), रविराज
सर्वोदे, शुभम सिदनाळे व 86 किलो वजन गटातून आशिष कवठे यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.वेताळ शेळके महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत पोहोचला.
विविध वजनी गटातील निकाल…
70 किलो गादी विभाग – सोनबा गोंगाने, कोल्हापूर (सुवर्णपदक), सर्वेश यादव, मुंबई (रजतपदक)
57 किलो गादी विभाग – सौरभ इगवे, सोलापूर (सुवर्णपदक), आतिष तोडकर (रजतपदक)
92 किलो गादी विभाग- सुशांत तांबोळकर (सुवर्णपदक), उदय खांडेकर, बीड (रजतपदक)
70 किलो माती विभाग – निखिल कदम, पुणे (सुवर्णपदक), संतोष गावडे (रजतपदक)
57 किलो माती विभाग – ज्योतिबा अटकळे, सोलापूर (सुवर्णपदक), अमोल बालगुडे (रजतपदक)
92 किलो माती विभाग – अमोल मुंडे, बीड (सुवर्णपदक), प्रशांत जगताप, अमरावती (रजतपदक)