कर्वेनगर – तब्बल दोन वर्षानंतर कुस्तीचे आखाडे भरू लागल्यामुळे कुस्ती पैलवानांची तयारी सुरू झाली. मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने “मातीवरील हवेली अजिंक्यपद जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा’ आयोजीत केली आहे. कर्वेनगर येथील सम्राट अशोक विद्यालयाच्या मैदानावर तयार करण्यात येणाऱ्या स्व. पै. नानासाहेब बराटे क्रीडानगरी आखाड्याचे आणि मांडवाचे भूमिपूजन आज कुस्तीप्रेमी आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्वेनगर हिंगणे बु. मधील ग्रामस्थ उपस्थित होते.
कुस्ती स्पर्धेचे आयोजन मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कोथरुड ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय खळदकर आणि मित्र परिवार यांनी केले. येत्या 14 आणि 15 एप्रिल दरम्यान ही हवेली अजिंक्यपद जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे.
करोनामुळे दोन वर्षांपासून कुस्तीचे आखाडे भरवता आले नाही. आखाड्यातील माती अंगाला लावून कधी कुस्ती खेळतोय असे प्रत्येक पैलवानाला वाटते, या चुरशीच्या कुस्ती पाहण्यासाठी कुस्तीप्रेमी उत्सुक असून, हीच उत्सुकता पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या मातीतील कुस्ती टिकून ठेवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे, असे विजय खळकदकर यांनी सांगितले.