पुणे- तब्बल 2,500 कोटी रुपयांचा प्रकल्प असलेल्या चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेसाठी पालिकेस अखेर सल्लागार मिळाला आहे. मागील दोन वर्षांपासून सल्लागाराअभावीच या योजनेचे काम रखडत होते. या प्रकल्पाचे काम करणाऱ्या “एसजीआय’ या इटलीतील सल्लागार कंपनीने प्रकल्प पूर्ण होण्याआधीच करोना तसेच आपला करार संपल्याचे कारण देत काढता पाय घेतला. त्यामुळे महापालिकेस नव्याने या कामासाठी सल्लागार नेमण्याची वेळ ओढावली. तर सल्लागाराचा खर्चही 9 कोटींनी वाढला आहे.
महापालिकेने समान पाणी योजनेसाठी “एसजीआय’ कंपनीची नेमणूक केली होती. त्यासाठी दहा वर्षांचा करार केला होता. मात्र, प्रत्यक्षात या योजनेचे काम 2017 मध्ये सुरू करण्यात आले. त्यानंतर जवळपास तीन वर्षे निविदांमध्येच गेली. त्यानंतर 2020, 2021 ही दोन वर्षे करोना काळातच गेली. दरम्यान, 2021 मध्ये करार संपल्याने तसेच महापालिकेने सल्लागाराकडून अतिशय कमी गतीने काम होत असल्याने कारवाईची नोटीस बजावल्याने कंपनीने काढता पाय घेतला.
तर 10 वर्षांच्या कामासाठी पालिकेने कंपनीस 8 ते 9 कोटींचे सल्लाशुल्क मोजले. दरम्यान, आता “वॉटर ऍड पॉवर कन्सलटन्सी सर्विसेस’ कंपनीची महापालिकेने सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे प्रकल्प अहवालात सल्लागारासाठी 18 कोटी 85 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित केला असला तरी पहिल्या सल्लागार 8 ते 9 कोटी दिल्याने तसेच नवीन सल्लागार 18 कोटी द्यायचे असल्याने प्रत्यक्षात आता पालिकेस 27 ते 28 कोटींचे सल्लाशुल्क योजनेसाठी मोजावे लागणार आहे.