पिंपरी -रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे होणारे नुकसान टाळण्याकरिता खासगी तेल कंपनी नयारा एस्सारकडून त्यांच्या पेट्रोल पंप डीलर्सना गेल्या दहा दिवसांपासून कमी प्रमाणात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे बारा डीलर्ससह राज्यातील 700 तर देशभरातील 5000 पेक्षा अधिक पंप गेल्या आठ दिवसांपासून बंद आहेत.
या कंपनीचे डीलर्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महापेट्रो डीलर्स असोसिएशनचे चिंचवड येथे आयोजित केलेल्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष योगेश बाबर यांनी मंगळवारी (दि. 5) पत्रकार परिषदेत दिली. दररोज इंधनाचे दर वाढत असतानादेखील केंद्र सरकारच्या अखत्यारितील तेल कंपन्या तोटा सहन करत पंपचालकांना पुरेशा प्रमाणात इंधन पुरवठा करत आहेत.
मात्र दुसरीकडे नयारा एस्सार कंपनीने जाणीवपूर्वक पुरवठा कमी केल्याचा आरोप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली. इंधन दरात 25 रूपयांची वाढ होत नाही, तोपर्यंत केवळ 25 टक्के पेट्रोल व डिझेल पुरवठा केला जाणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने कळविले असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत दिली. या कंपनीची डीलरशीप घेण्यासाठी प्रत्येक डीलरने एक ते दोन कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अनेकांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केला आहे. तर आता कंपनीकडून सुरू असलेल्या अपुऱ्या इंधन पुरवठ्यामुळे ग्राहक दुरावत आहेत, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत संघटनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत, ही बाब केंद्रीय पेट्रोलमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याची विनंती केली आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाशी चर्चा करूनही याबाबत या कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची माहिती यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला संघटनेचे गोंदिया, परभणी, नागपूर, कराड व पुणे जिल्ह्यातील डीलर्स
उपस्थित होते.