नवी दिल्ली – सार्वजनिक कंपन्यांनी इंधन दरवाढीचे सत्र मंगळवारीही सुरूच ठेवले. त्यामुळे लिटरमागे पेट्रोल आणखी 80 पैशांनी; तर डीझेल 70 पैशांनी महागले.
दरवाढीच्या सत्रामुळे देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दराने पुन्हा 100 रूपयांची पातळी ओलांडली. देशाच्या विविध भागांत पेट्रोलचा दर याआधीच 110 रूपयांवर गेला आहे.
सार्वजनिक कंपन्यांनी साडेचार महिने पेट्रोल आणि डीझेलच्या दरांत बदल केला नव्हता. त्यानंतर 22 मार्चला पहिल्यांदा दरवाढ झाली. तेव्हापासून 8 दिवसांत 7 वेळा दरवाढ झाली. त्या दरवाढींमध्ये मिळून पेट्रोल आणि डीझेल 4 रूपये 80 पैशांनी महागले आहे. ते दरवाढीचे सत्र ऐन उन्हाळ्यात सामान्य जनतेला महागाईचे तीव्र चटके देणारे ठरले आहे.