बेंगळुरू – माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या पत्नीला आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. त्यांचे पुत्र एच.डी. रेवण्णा यांनी हसन येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
दोडापूर आणि पदुवलाहिप्पे येथील पिढीजात शेतजमिनीच्या उत्पन्नाच्या संदर्भाने आपल्या आईला आयकर विभागाने नोटीस बजावली आहे, असे रेवण्णा यांनी सांगितले. त्यामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची माहिती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
आयकर विभागाने आपल्याला त्रास देण्यासाठी नोटीस द्यायला सुरुवात केली आहे.
आता आयकर विभागाने आपल्या आईला नोटीस बजावली आहे, असे रेवण्णा म्हणाले. आम्ही आमच्या शेतीमध्ये ऊसाचे पीक घेतो. याचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात यावे. हवे तर ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जावे. आपल्या पालकांनी कोट्यवधी रुपयांची माया जमा केली का? मोठी मालमत्ता उभी केली आहे का? मग एखाद्या राजकीय नेत्याच्या कुटुंबाला का लक्ष्य केले जाते आहे? असा प्रश्नही रेवण्णा यांनी उपस्थित केला.
मात्र या नोटीसीचा उपयोग राजकीय हेतूसाठी केला जाणार नाही, असे देवेगौडा यांचे पुत्र एच.डी.कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.