अकोला – शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हणचेच कापूस यास अच्छे दिन आले आहेत. कापसाला 11 हजार 845 इतका विक्रमी दर मिळाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे. विदर्भ,मराठवाडा व खान्देशात सर्वाधिक पिकणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 11 हजार 845 इतका विक्रमी दर मिळाला आहे. मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. परिणामी कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. मात्र व्यापाऱ्यांकडून कापसाला मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाला चांगला दर मिळाला आहे.
कापूस पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. याचे महत्वाचे कारण हे पिक घेणे शेतकऱ्यांसाठी खर्चीक होऊन बसले आहे. अनियमीत पाऊस, महागडी बियाणे, पिकांवरील रोगराई त्यासाठी करावी लागणारी फवारणी कापूस वेचाईसाठी लागणारा मजूर वर्ग त्यांची टंचाई इत्यादी अनेक कारणांमुळे कापूस पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. परिणामी कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे कापसाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.