पुणे –देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत पुण्याला पहिल्या पाचमध्ये ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाची धडपड सुरू असतानाच; शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजीला महापालिकाच खतपाणी घालत असल्याचे चित्र आहे. एका बाजूला एखाद्या नागरिकाने अथवा व्यावसायिकाने रस्त्याच्या कडेला, पदपथावर अनधिकृत शेड अथवा बांधकाम केले असल्यास जेसीबी लावून कारवाईचा आव आणणाऱ्या अतिक्रमण आणि आकाशचिन्ह विभागाकडून रस्त्यावर लावलेल्या मोठमोठ्या बॅनरचे फक्त फ्लेक्स काढले जात असून बांबूचा सांगाडा मात्र पुन्हा नव्याने जाहिरात लावण्यासाठी तसाच ठेवला जात आहे.
कारवाई थांबवण्यासाठी “तोडपाणी’
आयुक्तांनी शहरातील अतिक्रमणे, पदपथवरील फ्लेक्स, बोर्ड बॅनर्स, साईड मार्जिंनमधील बांधकामे काढण्याचे आदेश दिले आहेत. अतिक्रमण विभागाने या कारवाईसाठी पुढाकार घेतला आहे. कारवाई करताना कर्मचारी पत्राशेड, भिंती तोडून टाकतात. पथारी तसेच विक्रेत्यांचे साहित्य जप्त करतात. मात्र, अनधिकृत बोर्ड अथवा फ्लेक्स लावलेला असल्यास केवळ फ्लेक्स काढतात. फ्लेक्ससाठी लावलेला बांबूच्या सांगाड्याला हातही लावत नाहीत. प्रत्यक्षात हे बांबू मोडल्यास अथवा जप्त केल्यास सांगाड्यासाठी बांबू देणारे अनधिकृत फ्लेक्ससाठी बांबू देणार नाहीत. मात्र, सांगाडे उभारणांशी “तोडपाणी’ होत असल्यानेच कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.
दुर्घटनेची भीती
अशाप्रकारे लावण्यात आलेल्या सांगाड्यांमुळे दुर्घटनेचीही शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक सांगाड्यांना लोखंडी ग्रीलचा सपोर्ट द्यावा लागतो. तसेच त्याला मोठ्या लोखंडी शिड्याही असतात. हे सांगाडे उभारताना त्याचे कोणतेही स्ट्रक्चर ऑडिट होत नाही. त्यामुळे हे सांगाड्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.