राज्यमंत्री भरणे ः तावशीत साडेबारा कोटींची विकासकामे
भवानीनगर – माझ्या तालुक्यात अधिकचा निधी कसा मिळेल, यासाठी माझा प्रयत्न असतो. इंदापूर तालुक्याचा तीन वर्षांत चेहरा मोहरा बदलला नाही तर 2024च्या निवडणुकीला सामोरे येणार नाही, असा विश्वास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
तावशी (ता. इंदापूर) येथे 12 कोटी 44 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते रविवारी (दि. 19) करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील श्री छत्रपती कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, ऍड. रणजीत निंबाळकर, रसिक सरक, दत्तात्रय देवकाते, कुंदन देवकाते, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष ऍड. शुभम निंबाळकर, रोहन थोरात, पार्थ निंबाळकर, वसंतराव जगताप, श्रीनिवास कदम, योगेश माने, विक्रांत सरक, वीरेंद्र व्होरकाटे, राहुल व्होरकाटे उपस्थित होते.
भरणे म्हणाले, कै. राजेंद्रकुमार घोलप, कै. गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाचा राजकारणात फायदा झाला. त्यांचे आदर्श घेऊन कामे करीत आहे. प्रशासनाकडून काम कसं करायचं हे अजित पवार यांच्याकडून शिकलो राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे आपल्या पाठीशी असल्यामुळे तालुक्याला भरघोस निधी मिळत आहे. काम करताना लांबचा जवळचा जातीपातीचे राजकारण कधी केले नाही.
मागासवर्गीय लोकांसाठी रस्ते पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न करत आहे. राहिलेल्या तीन वर्षात तालुक्याचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला या भागातून चांगल्या प्रकारचे मतदान झाले ज्यांनी मतदान केलं त्यांचं ऋण फेडले पाहिजे.
माजी मंत्र्यांनी 19 वर्षांच्या काळात काय केलं बावडा, गोंदी, लुमेवाडी या भागांमध्ये रस्त्यांची काय परिस्थिती होती. तावशी येथे महिला भवनसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तावशी ते आसु पुलासाठी जो निधी लागेल तो उपलब्ध करून देण्यात येईल. काम असं करायचं की त्या कामाची लोकांनी दखल घेतली पाहिजे.
छत्रपती कारखान्याला चांगले दिवस येतील
श्री छत्रपती कारखान्याला अतिरिक्त ऊस व दुष्काळी परिस्थितीचा फार मोठा फटका बसला यावर्षीच्या गाळप हंगामाप्रमाणे किमान बारा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप सलग दोन वर्षें झाले तर कारखान्याला जुने दिवस आल्याशिवाय राहणार नाही. कारखान्याची गाळप क्षमता वाढवली नसती तर उसाची काय अवस्था झाली असती. संचालक मंडळाचे चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे.