लखनौ – उत्तरप्रदेशातील 49 विधानसभा मतदारसंघांमध्ये अतिशय अटीतटीच्या लढती झाल्या. त्या मतदारसंघांमध्ये विजयी ठरलेल्या उमेदवारांचे मताधिक्य 5 हजारांपेक्षा कमी नोंदले गेले.
भाजपच्या 2 उमेदवारांनी सपच्या उमेदवारांना केवळ 203 आणि 217 मतांच्या फरकाने पराभूत केले. भाजपच्या 3 उमेदवारांना 234, 261 आणि 269 मतांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले. उत्तरप्रदेशातील 6 मतदारसंघांमधील विजयी उमेदवारांचे मताधिक्य 1 हजारपेक्षा कमी होते.
सपचे सर्वांधिक 25 उमेदवार 5 हजारांपेक्षा कमी मताधिक्याने पराभूत झाले. त्याखालोखाल भाजपच्या 18 उमेदवारांवर प्रतिस्पर्ध्यांनी 5 हजारांपेक्षा कमी मताधिक्याने विजय मिळवला. सर्वांधिक मताधिक्य मिळवणाऱ्यांच्या यादीत पहिल्या पाच स्थानांवर भाजपचे उमेदवार राहिले. त्या पक्षाचे उमेदवार सुनीलकुमार शर्मा यांनी मिळवलेले 2.14 लाख मताधिक्य उत्तरप्रदेशात सर्वांधिक ठरले.
भाजपच्या आणखी 4 उमेदवारांनी 1 लाखपेक्षा अधिक मताधिक्य मिळवले. निवडणूक निकालांवेळी मताधिक्य हाही चर्चेचा विषय ठरत असतो. तो आकडा लढत चुरशीची झाली की एकतर्फी हे सांगण्यास पुरेसा ठरतो.