पुरी -चिलिकाचे (ओडिशा) आमदार प्रशांत जगदेव यांच्या मोटारीने 22 जणांना चिरडले. हा अपघात खुर्दा जिल्ह्यात शनिवारी दुपारी घडला असून यामध्ये 7 पोलिसांसह 22 जण जखमी झाले. त्यातील पाच जण अत्यवस्थ आहेत. संतप्त जमावाने मोटारीतून खेचून आमदाराला मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
बाणापूर येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या बाहेर ब्लॉक अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे काही समर्थक कजमले होते. यावेळी आमदार जगदेव यांची मोटार त्यांच्या अंगावर आली. काही समजण्याच्या आत या कारने तब्बल 22 जणांना चिरडले.
संतप्त जमावाने आमदार जगदेव यांच्यावर हल्ला केला.
तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केली. प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पांगवले. सध्या जखमी लोकांना तसेच आमदार जगदेव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती एसपी आलेखचंद्र पाधी यांनी दिली.
, प्रशांत जगदेव यांची बिजू जनता दलातून मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात हकालपट्टी करण्यात आली होती. जगदेव यांना जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षपदावरूनदेखील हटवण्यात आले होते. मात्र या घटनेनंतर ओडिशा राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज हरिशचंद्र यांनी आमदार जगदेव यांना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली आहे.