पुणे- पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली 23 गावांमधील बांधकाम परवानगीचे अधिकार पीएमआरडीएला आहेत. त्यानुसार दि. 31 डिसेंबर 2020 पूर्वीची गुंठेवारी पद्धतीने विकसित झालेली या गावांमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यास प्रक्रिया पीएमआरडीएने सुरू केली आहे. त्यानुसार या 23 गावांमधील फक्त गावठाण, दाटीवाटीचे क्षेत्र (कन्गेस्टेट झोन) आणि रहिवास झोन (आर झोन)मधील अनधिकृत बांधकामे नियमित होणार आहे.
उपनगरालगतची 23 गावे पालिकेत समाविष्ट करण्यात आली. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झाल्याने या गावांचा समावेश पालिकेमध्ये करण्यात आला आहे. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. पालिकेच्या हद्दीत ज्या प्रमाणे गुंठेवारीमधील बांधकामे नियमित करण्याची नियमावली जाहीर करण्यात आली. त्याचधर्तीवर पीएमआरडीएने हद्दीतील गावांमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे नियम जाहीर केले आहे.