पिंपरी – नंदी दूध पित असल्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि ही अफवा देशभर वाऱ्यासारखी पसरली. मध्यप्रदेशातून पसरलेली ही अफवा आता पिंपरी-चिंचवडपर्यंत येऊन पोहचली आहे. या अफवेमुळे शिवमंदिरामध्ये नंदीला दूध पाजण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या घटनेमागील शास्त्रीय कारण समजून घेत नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे.
मध्यप्रदेशमध्ये इंदौर, देवास, हरदा येथील काही लोकांनी नंदी दूध पित असल्याच्या पोस्ट फेसबुकवर टाकल्या आणि त्यासंदर्भातील व्हिडिओ आणि फोटो प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर हळूहळू देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होऊ लागली. नंदीला चमचाने दूध पाजत, त्याचे फोटो आणि व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकण्यात येऊ लागले. त्यामुळे या विषयाची मोठी चर्चा होऊ लागली आहे.
शहरातील काही शिवमंदिरांमध्ये शनिवारी संध्याकाळी नंदीला दूध पाजण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. काही मंदिरांमध्ये तर रात्री उशिरापर्यंत लोकांच्या रांगा लागल्या होत्या. चिखली येथील ताम्हाणे वस्तीतील तुळजाभवानी मंदिर येथील नंदीला दूध पाजण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी मिलिंद देशमुख म्हणाले, नंदी दूध पितो तर मग चारा का खात नाही, या पूर्णपणे अफवा असून अशा प्रकारच्या घटनांमध्ये काहीही तथ्य नाही. लोकांनी या घटनेमागील शास्त्रीय कारण समजून घ्यावे व अफवा आणखी पसरणार नाही, याची काळजी घ्यावी. या प्रकाराचा पोलिसांनी दखल घेतल्याचेही ते म्हणाले.