भटींडा – युध्दग्रस्त युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांना भयावह अनुभवांना सामोरे जावे लागत असतानाच पंजाबमधील बर्नाला येथील एका विद्यार्थ्याचा बुधवारी मृत्यू झाला. मात्र, त्याचा मृत्यू आजारपणामुळे झाला आहे.
चंदन जिंदाल ( Chandan Jindal ) हा विद्यार्थी वॅन्नित्सीया विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमाला चौथ्या वर्षाला शिकत होता. त्याचा आज सकाळी मृत्यू झाला. त्याच्या मेंदुत रक्ताच्या गाठी निर्माण झाल्याने त्याच्यावर महिनाभरापासून येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या गंभीर आजाराची माहिती मिळताच त्याचे वडील आणि भाऊ सात फेब्रुवारीला युक्रेनला पोहोचले होते.
युक्रेनच्या पश्चिम भागात ते असल्याने मंगळवारी भाऊ कृष्णन गोपाल मंगळवारी भारतात परतले तर वडील शिसान कुमार हे अद्याप युक्रेनमध्ये आहेत. चंदनला मेंदुविकाराने अनेक दिवसापासून ग्रासले होते. दीर्घकाळ त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे आम्हाला आज समजले.
युक्रेनमधील युध्दाची स्थिती चिंताजनक असली तरी त्याचे पार्थिव भारतात आणण्यासाठी आम्ही परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या संपर्कात आहोत, असे त्याचे काका धीरज कुमार दद्दाहूर यांनी सांगितले.