पुणे – बॅंक कर्मचारी असलेल्या प्रवाशाचे स्वारगेट बस स्थानकातून अपहरण करुन फोन पेद्वारे खंडणी उकळण्यात आली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गणेश निवृत्ती दराडे (24, रा. पाटोदा जि. बीड, सध्या कर्वेनगर) याला अटक केली आहे. तो सध्या एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. तरीही तो गुन्हेगारी मार्गाला लागल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे.
फिर्यादी रोहित ईश्वर पवार (27, रा. रायगड) हे अलिबाग येथील एका राष्ट्रीयकृत बॅंकेत कर्मचारी आहेत. त्यांचे मूळगाव जेजुरी आहे. तेथे जाण्यासाठी ते स्वारगेट येथे रात्री 11.30 वाजता उतरले होते. जेजुरीला जाणारी शेवटची बस सुटल्याने ते खासगी वाहन शोधत प्रवेशद्वाराजवळ आले. तेथे दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांना मारहाण करुन जबरदस्तीने दुचाकीवर बसवले.
यानंतर मुकुंदनगर येथील एका बंगल्याजवळ नेले. यानंतर त्यांना पुन्हा मारहाण करत फोन पे ऍप पासवर्ड ओपन करुन घेतला. त्याद्वारे प्रथम 5 हजार, नंतर 60 हजार आणि परत 2 हजार असे 67 हजार रुपये वर्ग करुन घेतले.
यानंतर फियादीला तेथेच सोडून गेले. फिर्यादी यांच्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी घटनेच्या 14 दिवसानंतर तक्रार दिली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) जाधव करत आहेत.