पुणे – मार्केट यार्ड येथून घरी जाणाऱ्या टेम्पो चालकास अडवून टोळक्याने लाथाबुक्क्यांनी व डोक्यात दगड घालून जबर मारहाण केली. या घटनेत टेम्पोचालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.
दयानंद भीमराव सीतापरराव (वय 30), सुमीत भीमराव सीतापरराव (वय 24,रा. निंबाळकर वस्ती, गुजर निंबाळकरवाडी, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांच्यासह विकी जाधव (वय 28) व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिजीत दिघे (वय 35, रा. भारतनगर, निंबाळकरवस्ती, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा टेम्पो असून वाहतुकीचा व्यवसाय आहे. शनिवारी रात्री ते मार्केट यार्ड येथील काम संपवून घरी येत होते. त्यावेळी कात्रज येथील भारतनगर, निंबाळकरवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांचा टेम्पो आला. त्यावेळी टोळक्याने त्यांना अडविले. त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. तर फिर्यादीच्या मदतीला येणाऱ्या नागरीकांनाही “आम्ही इथले भाई आहोत, कुणीही पुढे यायचे नाही, अन्यथा कोणाला सोडणार नाही’ अशा शब्दात धमकी देऊन दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना वाचविण्यासाठी त्यांनी पत्नी तेथे आली. त्यावेळी त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच “आम्ही इथले भाई आहोत, जेलमधून सुटून आल्यावर तुम्हाला संपवू’अशी धमकी त्यांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश ढमे करीत आहेत.