मुंबई – ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन परीक्षा घ्यावी या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी दहावी-बारावीचे विद्यार्थी रसत्यावर उतरले आणि आंदोलन केले होते. या विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकवल्याप्रकरणी युट्यूबर विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आज त्याला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने 30 हजाराच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहे.
राज्यातील दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्यात याव्यात या मागणीसाठी विनंती पत्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यासाठी जात असल्याचे भाऊे जाहीर केले होते. त्याने एक व्हिडीओ संदेश जारी करत विद्यार्थ्यांना तिथे हजर राहण्यास सांगितले. सोशल मीडिया स्टार असलेस्या भाऊच्या या हाकेला प्रतिसाद देत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अचानक आंदोलन सुरू केले. मुंबईत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थी एकवटले आणि आंदोलन सुरू केले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई करत पाठकला अटक केली होती. त्यांतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे जामीनाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे हिंदुस्थानी भाऊने वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात असून अधिकची चौकशी आणि तपास आवश्यक असल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून न्यायालयात केला आणि त्यांनी भाऊच्या जामीन अर्जाला विरोध केला. त्यांची बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर अखेर आज पाठकला जामीन मंजूर झाला असून जेलमधून त्याची सुटका झाली आहे.