पुणे – चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत दुहेरीत रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन या भारतीय स्टार जोडीने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत या गटाचे विजेतेपद संपादन केले. एकेरीत पोर्तुगालचा स्टार खेळाडू जाओ सौसा याने विजेतेपद पटकावले.
म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पोर्तुगालचा स्टार खेळाडू जाओ सौसा याने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत 2018 सालापासून आपले पाहिले एकेरीतील विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत चुरशीच्या लढतीत जाओ याने युवा खेळाडू एमिल रुसूवोरीचा 7-6 (11-9), 4-6, 6-1 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
पोर्तुगालचा सर्वोत्तम खेळाडू असलेल्या व माजी जागतिक क्रमवारीत 28 व्या स्थानी असलेल्या सौसाने सुरेख व संयमी खेळ करत तीन सेटमध्ये एमिलवर विजय मिळवला. सौसाचे आपल्या कारकिर्दीतील हे चौथे एटीपीचे विजेतेपद आहे.
हि प्रतिष्ठेची स्पर्धा आयएमजी यांच्या मालकी ची असून राईज वर्ल्डवाईड इन इंडिया यांनी संचालित केली आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष मोहन सावरकर, स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार, एमएसएलटीएचे मानद सचिव व एआयटीएचे सहसचिव सुंदर अय्यर, राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.