पुणे : जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने ’ऑस्ट्रेलियन ओपन’च्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या डॅनियल कॉलिन्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
शनिवारी खेळला गेलेला हा अंतिम सामना खूपच रोमांचक झाला. दोन्ही खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी चुरस होती. शेवटी बार्टीने उत्कृष्ट खेळ दाखवत विजयाची नोंद करत इतिहास घडवला. बार्टीच्या रुपाने ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत 44 वर्षांचा दुष्काळ संपवला.
ऑस्ट्रेलियन ओपन एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी बार्टी ही 1980 मध्ये वेंडी टर्नबुलनंतरची पहिली ऑस्ट्रेलियन महिला होती आणि आता 1978 मध्ये ख्रिस्टीना ओ’नीलनंतरची पहिली ऑस्ट्रेलियन चॅम्पियन आहे. 25 वर्षीय बार्टीच्या नावावर आता तीन मोठी विजेतेपदे जिंकण्याचा विक्रम आहे. तिने गेल्या वर्षी विम्बल्डन आणि 2019 मध्ये फ्रेंच ओपन जिंकून दहशत निर्माण केली आहे.
अॅश्ले बार्टीच्या विजेतेपदानिमित्त तीचा क्रिकेटपटू ते ग्रँडस्लॅम विजेती असा रंजक प्रवास या लेखातून उलगडणार आहोत.
कोण आहे अॅश बार्टी?
24 एप्रिल 1996 मध्ये जन्मलेल्या अॅश बार्टीचे पूर्ण नाव अॅश्ले बार्टी आहे, पण ती जगभरात अॅश या टोपण नावाने ओळखली जाते. अॅश बार्टी एक ऑस्ट्रेलियन व्यावसायिक टेनिस खेळाडू आणि माजी क्रिकेटपटू आहे. ती महिला टेनिस असोसिएशनच्या एकेरी क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. बार्टी हा तीन वेळा ग्रँडस्लॅम एकेरी चॅम्पियन आणि सध्याची ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन आहे. तिने ग्रँड स्लॅम दुहेरी विजेतेपदही पटकावले आहे. .
टेनिस सोडून क्रिकेटमध्ये कमावले नाव
बार्टीचे पहिले प्रेम भलेही टेनिस असेल, पण तिला क्रिकेटचीही तितकीच आवड आहे. 2014 मध्ये यूएस ओपनमध्ये पहिल्या फेरीतून बाहेर पडल्यानंतर बार्टीने 8 वर्षांपूर्वी या टेनिसमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. 2015 मध्ये तिने रॅकेट सोडून बॅट हाती घेतली. अॅशने टेनिसपासून इतके अंतर ठेवले की, खेळणे तर दूरच, त्याने याबद्दल बोलणेही बंद केले होते.
त्या काळात तिचे एकेरी रँकिंग 216 आणि दुहेरीचे 40 होते. 2015 मध्ये ब्रिस्बेन हीट आणि क्वीनलँड महिलांसाठी महिला बिग बॅशमध्ये अष्टपैलू म्हणून खेळली. त्यानंतर जेव्हा तिने क्रिकेटमध्ये झेंडा रोवला तेव्हा 2016 मध्ये ती पुन्हा व्यावसायिक टेनिसमध्ये परतली.
15व्या वर्षी विम्बल्डनची ज्युनियर चॅम्पियन
बार्टी लहानपणी नेटबॉल खेळायची पण नंतर तिने टेनिससाठी नेटबॉल सोडला. टेनिसचे रॅकेट हातात घेतल्यानंतर तिने यशाच्या पायर्या झपाट्याने चढण्यास सुरुवात केली. 10व्या वर्षी ती पहिल्यांदाच विम्बल्डनच्या कोर्टवर चमकली आणि वयाच्या 15 व्या वर्षी ती ज्युनियर चॅम्पियन बनली.
बार्टीने रचला इतिहास
यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी बार्टी 1980 मध्ये वेंडी टर्नबुलनंतरची पहिली ऑस्ट्रेलियन महिला ठरली. तसेच 1978 मध्ये ख्रिस ओ’नीलनंतर स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी ती पहिली ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटू आहे.
मूळनिवासी आदीवासींची राजदूत
2018 मध्ये बार्टीला राष्ट्रीय मूळनिवासी आदीवासींची राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले. टेनिस ऑस्ट्रेलियाला दिलेल्या मुलाखतीत बार्टी म्हणाली, आम्हाला आमच्या नागरागु जमातीचा खूप अभिमान आहे. मी एक अत्यंत अभिमानास्पद आदीवासी स्त्री आहे. टेनिसमुळे मी जगाचा प्रवास करू शकली आणि माझा वारसा एका प्रकारे दाखवू शकली.