पुणे : आयपीएल 2022 चा मेगा लिलाव 12 फेब्रुवारी आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा मेगा लिलाव पंजाब, कोलकाता आणि बंगळुरू संघांसाठी महत्वाचा असणार आहे. कारण या 3 संघांव्यतिरिक्त इतर सर्व 7 संघांनी आयपीएल 2022 साठी त्यांचे कर्णधार घोषित केले आहेत.
गेल्या मोसमात इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र यंदाच्या मोसमात त्याला फ्रेंचायझीने कायम ठेवले नाही. केकेआर ने परदेशी खेळाडूंमध्ये आंद्रे रसेल आणि सुनील नरेन आणि भारतीय खेळाडूंमध्ये व्यंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांना कायम ठेवले आहे. केकेआरसाठी हा लिलाव खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण ते त्यांच्या संघासाठी एका चांगल्या कर्णधाराच्या शोधात आहेत. या लेखातून आम्ही कोलकाता नाइट रायडर्स संघाला कर्णधार पदासाठी उपलब्ध असलेल्या 3 पर्यायांविषयी सांगणार आहोत.
1) डेव्हिड वॉर्नर
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. त्याने 67 सामन्यांमध्ये या संघाचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये त्याने 35 सामने जिंकले आहेत. गेल्या मोसमात खराब कामगिरीमुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि केन विल्यमसनकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. त्याचबरोबर 2022 च्या मेगा लिलावापूर्वी हैदराबादने वॉर्नला करारमुक्त केल्यामुळे तो लिलावात सर्व संघासाठी उपलब्ध असणार आहे. कर्णधारपदाचा अनुभव आणि टी20 विश्वचषक 2021 चा मालिकावीर वॉर्नरला या लिलावात कोलकाता त्यांच्या संघाचा कर्णधार म्हणून खरेदी करू शकते.
2) श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यर हा आयपीएलमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. एवढेच नाही तर 2018 ते 2020 पर्यंत त्याने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्वही केले आहे. 2018 मध्ये जेव्हा गौतम गंभीर संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला तेव्हा फ्रँचायझीने या तरुणाची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने 2019 मध्ये प्लेऑफ आणि 2020 मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. अय्यरने दिल्लीसाठी 41 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले असून त्यात त्यांनी 21 सामने जिंकले आहेत.
मात्र, गेल्या मोसमात दुखापतीमुळे श्रेयस अय्यर आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातून बाहेर पडला होता आणि त्याच्या जागी ऋषभ पंतला कर्णधार बनवण्यात आले होते. त्याचे उत्कृष्ट कर्णधार आणि फलंदाजीचे प्रदर्शन असूनही, त्याला या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने कायम ठेवले नाही. त्यामुळेच केकेआर त्याच्यावर मोठी पैज लावून त्याला विकत घेऊन आपल्या संघाचा कर्णधार बनवू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
3) शिखर धवन
शिखर धवन गेली सलग 2 वर्षे दिल्ली कॅपिटल्ससाठी चमकदार कामगिरी करत आहे आणि संघाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील आहे. एवढेच नाही तर धवनने आयपीएलच्या 10 सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपदही भूषवले आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याला या मोसमात कायम ठेवले नसल्यामुळे केकेआर त्याला या लिलावात विकत घेऊन आपल्या संघाचा कर्णधार बनवू शकते असा अंदाज लावला जात आहे. कारण केकेआरला त्यांच्या संघात अनुभवी खेळाडूंना संधी द्यायची आहे, जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा संपूर्ण संघाला फायदा होईल.