भिवंडी – झोपडीवर कोळसा भरलेल्या ट्रकची ट्रॉली कोसळून भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात तीन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात भिवंडी तालुक्याती टेंभिवली गावाच्या परिसरात एका वीटभट्टीच्या शेजारी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या विषयी माहिती अशी की, कोळसा खाली करत असताना ट्रकचा शॉकअप्सर अचानक तुटला ज्याठिकाणी कोळसा खाली केला जात होता त्याठिकाणी वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची झोपडी होती. या झोपडीत मजुराची पत्नी आणि तीन मुले होती. त्यावेळी कोळशाने भरलेल्या ट्रकची ट्रॉली त्या झोपडीवर कोसळली. यामुळे संपूर्ण झोपडी कोळशाखाली गाडली गेली. ही घटना कळताच इतर मजुरांनी वेळेत कोळसा बाजुला करण्यास सुरुवात केली मात्र यामध्ये तीन बहिणींचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भिवंडी तालुका पोलीसांनी धाव घेतली. या अपघाताची पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून भिवंडी पोलीसात गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे.