हॉंगकॉंग – हॉंगकॉंगमधील 9 घुशींना करोनाची लागण झाली असल्याचे उघड झाले आहे. करोनाची लागण झाल्याच्या संशयावरून हॉंगकॉंगमधील 2,600 घुशींना पकडून त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 9 घुशींना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हॉंगकॉंगमधील स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी याबाबतचे वृत्त शनिवारी प्रसिद्ध केले आहे.
नेदरलॅन्डच्या जहाजामधून हॉंगकॉंगमध्ये आणण्यात आलेल्या घुशींच्या माध्यमातून हॉंगकॉंगमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या संशयावरून ही तपासणी करण्यात आली. हॉंगकॉंगमधील पशू बाजारातून 4 ते 11 जानेवारी दरम्यान ज्या महिलांनी घुशींची खरेदी केली होती, त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यावरून हा संशय अधिक वाढला आहे.
यापूर्वी अमेरिकेतील आणि ब्रिटनमधील प्राणिसंग्रहालयातील वाघ-सिंहांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. तर काही पाणघोड्यांनाही संसर्ग झाल्याचे आढळले होते. त्यावेळीही करोनाचा संसर्ग प्राण्यांकडून मानवाला होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे स्पष्टिकरण जागतिक आरोग्य संघटनेने दिले होते.