मुंबई – मुंबई -शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटात केलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अनेकांनी या भूमिकेला विरोध दर्शवला आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध करण्यात आला होता. या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत कोल्हेंची पाठराखण केली.
कोणत्याही चित्रपटात एखादा कलाकार जर एखादी भूमिका करत असेल तर आपण त्याकडे केवळ कलाकार म्हणूनच पहावं. गांधी सिनेमा संपूर्ण जगात गाजला होता. त्या चित्रपटातही कोणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका ज्याने केली तो कलाकार होता, तो काही नथुराम गोडसे नव्हता. म्हणून चित्रपटात एकादी भूमिका साकारत असलेल्या व्यक्तीला कलाकार म्हणूनच पाहावे, असं शरद पवार यांनी म्हटलं.
दरम्यान यावर आता माजी मुख्यमंत्री आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल मत व्यक्त करत एकप्रकारे अमोल कोल्हे यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, कोण काय भूमिका साकारतो, यावर आम्हाला काही घेणदेण नाही. पण कोणत्याही परिस्थितीत नाथूराम गोडसेचं उदात्तीकरण होऊ नये, अशी आमची भूमिका असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं.