नवी दिल्ली : भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर त्यांच्या वक्तव्याने नेहमीच वाद निर्माण करत असतात. सध्या अशाच एका वक्तव्याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा आहे. त्यांच्या या वक्तव्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दारू औषधी असल्याचे प्रज्ञा सिंह सांगताना पाहायला मिळत आहेत.
मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान सरकारने नवं आबकारी धोरण आणलं आहे. ते १ एप्रिल २०२२ पासून लागू होणार आहे. यानुसार मध्य प्रदेशमध्ये दारू स्वस्त होणार आहे. यावरच पत्रकारांनी प्रश्न विचारला असता भाजपा खासदार प्रज्ञा सिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
VIDEO: "दारू स्वस्त असो किंवा महाग, दारू औषधाचं काम करते आणि…", भाजपा खासदार प्रज्ञा सिंह यांचं वक्तव्य | Pradnya Singh Thakur on Alcohol as Medicine#PradnyaSinghThakur #Alcohol #म #मराठी pic.twitter.com/ZVVqZqBwN9
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू 🇮🇳✊ (@PravinSindhu) January 21, 2022
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर, “दारू स्वस्त असो किंवा महाग, दारू औषधाचं काम करते. आयुर्वेदात दारू म्हणजेच अल्कोहोलचा मर्यादित वापर औषधी असतो आणि अमर्याद स्वरुपात ते विष असतं, हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. दारू अधिक घेतल्याने नुकसान होतं हे समजून घेत बंद केली पाहिजे.”असे म्हणताना दिसत आहेत.
प्रज्ञा सिंह या अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत राहतात. याआधीही त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. यात कधी नथुराम गोडसे यांना देशभक्त म्हटल्याचे वक्तव्य, तर कधी महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांना श्राप दिल्याचे म्हणत केलेली आक्षेपार्ह टीका याचा समावेश आहे.