सातारा ,वळसे (प्रतिनिधी) – येथील अजिंक्यतारा सहकारी सूतगिरणीतील कामगारांना या जानेवारीपासून भरघोस पगारवाढ करण्यात आली असून यामुळे गिरणी कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोविडमुळे व्यवसायात आलेली मंदी तसेच बेकारीचे वाढते प्रमाण या सर्व गोष्टींचा विचार करता तसेच वाढलेली महागाई यामुळे औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये भरमसाठ वाढलेले कापसाचे दर व त्या प्रमाणात सूतास योग्य दर मिळत नसल्याने सूत गिरणी व्यवसायाला अडचणीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे.
अशा कठीण परिस्थितीतही अजिंक्यतारा सूतगिरणीने अडचणींवर मार्ग काढत सूत निर्यात करण्याचा धाडसी निर्णय घेतला व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अजिंक्य स्पिन सूतास नावलौकिक मिळवून दिला असून सूत निर्यातीमुळे गिरणीची आर्थिक परिस्थीती मजबूत ठेवता आली, ही बाब गौरवास्पद असल्याचे संस्थेचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी सांगितले. सतत वाढणाऱ्या महागाईचा विचार करता संस्थेच्या कर्मचारी वर्गालाही आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी व्यवस्थापनाने कामगारांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांना जानेवारीपासून वेतनवाढ देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे भोसले उपस्थित होत्या. गिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, व्हाइस चेअरमन बापूराव महाडिक, संचालक गणपतराव मोहिते, अजित साळुंखे, बळिराम देशमुख, जगन्नाथ किर्दत, भरत मतकर, भरत कदम, सचिन गायकवाड, सुरेश टिळेकर, रघुनाथ जाधव, आबासो साबळे, अशोक काठाळे, अशोक कदम, उल्हास भोसले, सुनील देशमुख, भगवान शेडगे, संचालिका सौ. रत्नमाला डांगे, सौ. साधना फडतरे यांच्यासह गिरणीचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी, चीफ अकौंटंट मानसिंग पवार, प्रॉडक्शन मॅनेजर रमेश निळकंठ, मिल इंजिनियर प्रदीप राणे, एचआर मॅनेजर राजेश दीक्षित, सर्व कर्मचारी व महिला कामगार उपस्थित होते.