सातारा- वाहनांना आकर्षक क्रमांक घेण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नेमका याच संधीचा फायदा आरटीओ कार्यालयातील काही सरकारी बाबू अन दलाल मिळून घेत असल्याचे चित्र आहे. नंबरच्या मार्केटिंगसाठी आरटीओला समांतर यंत्रणा दगडी भिंतीच्या बाहेर काम करत असल्याने सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे.
सध्या नवीन गाड्यांना आकर्षक नंबर घेण्याचे फॅड खासकरून युवा वर्गात मोठ्या प्रमाणात आहे. आकर्षक नंबर मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी परिवहन विभागाकडून खास नंबरची यादी प्रसिद्ध केली जाते. त्यानुसार ठराविक नंबरला त्या त्या प्रमाणात सरकारी रक्कम आकारली जाते.
एखादा खास नंबर घेण्यासाठी नागरिकांची मागणी वाढली तर त्या नंबरसाठी जास्त रक्कम अदा करेल त्या वाहनधारकाला प्राधान्य देण्याचा परिवहन विभागाचा नियम आहे. मात्र, साताऱ्यात याउलट चित्र असून आकर्षक नंबरसाठी विनाकारण ग्राहकांमध्ये चुरस निर्माण करून त्या नंबरचे मार्केटिंग करणारी आरटीओला समांतर यंत्रणा दगडी भिंतीबाहेर काम करत आहे.
कोणत्या नंबरला किती बोली लागते यापेक्षा कोणत्या नंबरमधून आपला खिसा भरला जाईल याकडे आरटीओ कार्यालयातील बाबूंचे व दलालांचे लक्ष असते. नागरिकांना पसंतीचा व आकर्षक नंबर मिळावा यासाठी आरटीओमध्ये स्वतंत्र टेबल देण्यात आला आहे. त्याठिकाणी नोंद करून वाहनधारक आपल्या पसंतीचा नंबर घेतात आणि त्यामधून परिवहन विभागाला प्रतिवर्षी लाखो रुपयांचा अतिरिक्त महसूलही मिळत असतो.
या प्रक्रियेमध्ये ऑनलाइन प्रणालीचा समावेश झाल्याने आरटीओ कार्यालयातील अनेक बाबू दलालांनी नामी शक्कल लढवत दगडी भिंतीच्या बाहेर ठएवलेली एक समांतर यंत्रणा आकर्षक नंबरसाठी येणाऱ्या लोकांना बाहेरच थांबवून त्यांना हवा असलेला नंबर यापूर्वीच बुक झाल्याची बतावणी करून शक्य तितका मलिदा उकळत असते.
इतकचं काय पण संबंधित वाहनधारकांच्या समोरच आतल्या बाबू लोकांना फोन लावून अमका तमका त्या नंबरसाठी किती पैसे देत मागे लागलाय, किती लोक तो नंबर मागत आहेत, असे सांगणारी समांतर यंत्रणा आरटीओ कार्यालयाच्या बाहेर झाडांच्या सावलीला निवांतपणे काम करत आहे.