जम्मू –भारतीय हद्दीत शिरकाव केलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाला शनिवारी सीमेलगत अटक करण्यात आली. ती कारवाई सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी जम्मू-काश्मीरमधील सांबा क्षेत्रात केली. पाकिस्तानी नागरिक सीमा ओलांडून भारतीय हद्दीत सुमारे दोनशे मीटर अंतरापर्यंत आला. सतर्क जवानांनी तातडीने हालचाली करून त्याला पकडले.
त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यातून तो अनावधानाने सीमा ओलांडून भारतीय हद्दीत शिरल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला पुन्हा पाकिस्तानच्या ताब्यात सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता बीएसएफची पाकिस्तानी दलाशी (रेंजर्स) ध्वज बैठक होईल. त्या बैठकीत सर्व औपचारिकता पूर्ण करून पाकिस्तानी नागरिकाला रेंजर्सच्या ताब्यात सोपवले जाईल, अशी माहिती बीएसएफच्या सुत्रांनी दिली.