कोल्हापूर – ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी ड्रोन तंत्राद्वारे विद्राव्य खते, औषधे, कीटकनाशके यांची फवारणी उपयुक्त ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी अनेक उपक्रमशील प्रयोग राबवित असताना ड्रोनद्वारे खत फवारणी तंत्रास प्रोत्साहन दिले आहे.त्यामुळे ड्रोनद्वारे शाहूच्या शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे.अशी घोषणा शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली.
श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत कागल येथील शेतकरी शंकर पोवार यांच्या ऊस पिकावर ड्रोनतंत्राद्वारे फवारणीचे जिल्ह्यातील पहिले प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
उंच वाढलेल्या ऊस पिकात मजूरांकरवी फवारणी करता येत नाही. तसेच मनुष्यबळाअभावी इच्छा असूनही शेतकऱ्यांना या फवारण्या वेळेत घेता येत नाहीत. यावर पर्याय म्हणून अत्याधुनिक तंत्राद्वारे तयार केलेले ड्रोनद्वारे फवारणीचे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. या ड्रोन तंत्रामुळे पारंपरिक फवारणीच्या तुलनेत सर्वच बाबतीत किमान खर्चामध्ये कमाल फायदा होतो.
त्यामध्ये आठ ते दहा मिनिटांत मिनिटात एक एकर ऊस पिकाची फवारणी पूर्ण होते. एकरी आठ ते दहा लिटर पाण्याचा औषधासहित वापर, समांतर खोलवर व एकसमान फवारणी होते.
औषधांमध्ये बचत होते. जमिनीची सुपीकता राखण्यास उपयुक्त ठरून वेळ, श्रम, खर्च, औषधे यांचीही बचत होते.शिवाय सुरक्षितपणे फवारणी केली जाते. विद्राव्य खते, जिवाणू, कीटकनाशके, ऊस पीक वाढीसाठी आवश्यक संप्रेरके यांची फवारणी करता येते, असे चातक इनोवेशनचे कार्यकारी संचालक सुभाष जमदाडे यांनी सांगितले. यंत्राची किंमत जास्त असल्याने कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना फवारणीची सुविधा मिळणार आहे.