नवी दिल्ली – इटलीवरून अमृतसरला आलेल्या एका चार्टर विमानातील तब्बल 125 प्रवाशांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अमृतसरमध्ये उतरल्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीदरम्यान या प्रवाशांना करोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या विमानामध्ये एकूण 179 प्रवासी होते. हे विमान इटलीवरून अमृतसरला बुधवारी दुपारी 1.30 वाजता दाखल झाले, इटलीमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सध्या खूप जास्त आहे. त्यामुळे विमानातील सर्वच्या सर्व 160 प्रवाशांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 125 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे तपासणीच्या अहवालातून स्पष्ट झाले, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले.
या 179 प्रवाशांमध्ये 19 मुले होती. त्यामुळे त्यांना आरटी-पीसीआर चाचणीमधून वगळण्यात आले, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. इटलीतील मिलान ते अमृतसर दरम्यानची चार्टर विमानसेवा पोर्तुगालच्या युरो अटलांटिक एअरवेज या विमान कंपनीने उपलब्ध करून दिली होती.