पुणे – शेजारच्या महिलेचा खून करणाऱ्याला जन्मठेप आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी सुनावली. नवनाथ रामचंद्र पानसरे (29, रा. भांडवली, भोर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
या प्रकरणात गुन्हा सिद्ध करण्यासाठी हातातील माळेचा पुरावा महत्त्वाचा ठरला. पानसरे हातात मण्यांची माळ घालायचा. घटनेच्या दिवशी महिलेबरोबर झटापट झाल्याने ती माळ तुटून त्यातील काही मनी घटनास्थळी पडले होते. हे मनी पानसरे याच्या हातात असलेल्या माळेतीलच असल्याचे महिलेच्या मुलीने ओळखले होते. तसेच घटनास्थळी सापडलेल्या मन्यांसारखेच मनी पानसरे याच्या घरातून हस्तगत करण्यात आले होते. त्यामुळे पानसरे याच्या हातातील मन्यांची माळ गुन्हा सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा पुरवा ठरली, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील ऍड. सुनील मोरे यांनी दिली.
े भोरमधील 35 वर्षीय महिलेचा 27 फेब्रुवारी 2015 रोजी खून गळ्यावर वार करून खून केला होता. याबाबत अनिल लक्ष्मण डोंबे (वय 40, रा. भोर) यांनी भोर पोलिसांत फिर्याद दिली होती. घटनेदिवशी त्याने महिलेचा टोकदार हत्याराने गळ्यावर वार करून खून केला. त्याला महिलेच्या घरातून बाहेर पडताना या खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार ठरलेल्या दोघांनी पाहिले होते.
पोलीस चौकशीत आरोपीने हा खून केल्याचे कबूल केले होते. खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांनी 11 साक्षीदार तपासले. न्यायालयीन कामकाजात पोलीस हवालदार ए. एम. शेख यांनी मदत केली.