काबूल – अफगाणिस्तानमध्ये तालिबानने आता टिव्ही मालिकांवरही निर्बंध आणले आहेत. ज्या मालिकांमध्ये हिजाब न घातलेल्या नायिका असतील आणि ज्या मालिकांमध्ये संगीत वाजवले जात असेल, अशा मालिकांवर तालिबानकडून बंदी घातली आहे. काळानुरुप बदलणारे कपडे घातलेल्या महिलांच्या जाहिरातींवरही बंदी घालण्यात आली आहे.
अफगाणी संस्कृतीशी विसंगत असलेल्या आणि शरीया कायद्याशी विसंगत आहेत, अशा विदेशी मालिका प्रसारीत करू नयेत. कोणत्याही प्रकारचे संगीत काटेकोरपणे वाजवू नये, असे प्रसार माध्यमांना सांगण्यात आल्याचे रशियाच्या वृत्तसंस्थने म्हटले आहे.
याशिवाय वृत्तवाहिन्यांसाठीही काही कठोर नियम घालून दिले गेले आहेत. वृत्तवाहिन्यांनी ठोस माहितीच्या आधारेच बातम्या द्याव्यात. अफवांच्या आधारे अथवा केवळ ऐकिव माहितीच्या आधारे बातम्या देऊ नये.
अफगाणिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या परदेशी वृत्तसंस्थांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा या वृत्तसंस्थांवर बंदी घातली जाईल, असे या नियमांमध्ये म्हटले आहे. या वाढत्या नियमांमुळे पत्रकारितेचे काम अधिकच गुंतागुंतीचे बनायला लागले आहे. तसेच वृत्त माध्यमे बंद पडण्याची भीती अनेक पत्रकारांना वाटू लागली आहे.