बीजिंग – अब्जाधीश इयॉन मस्क यांच्या स्टारलिंक इंटकनेट सर्व्हिसेस प्रोजेक्ट अंतर्गत स्पेसएक्सने सोडलेल्या उपग्रहामुळे आपल्या अंतराळ स्थानकाला धोका निर्माण झाल्याचा दावा चीनने केला आहे. स्पेसएक्सचा कॅमेरा दोनवेळा आपल्या अंतराळ स्थानकाच्या अगदी जवळ येऊन गेला असल्याचा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजान यांनी केला आहे. चीनने या संदर्भात संयुक्त राष्ट्राकडेही तक्रार नोंदवली आहे.
इयॉन मस्क यांच्या अवकाश यानाशी धडक होऊ नये, याची काळजी आपल्या अंतराळ स्थानकाला घ्यावी लागली होती. यावर्षी जुलै आणि ऑक्टोबरमध्ये स्पेसएक्स उपग्रह आणि चीनचे अंतराळ स्थानक दोनवेळा एकमेकांच्या जवळ आले होते. त्यावेळी अंतराळ स्थानकातील अंतराळ संशोधक एका मोहिमेचे काम करत होते. धडक टाळण्यासाठी अंतराळ स्थानकाला सुरक्षिततेच्या उपाय योजना कराव्या लागल्या होत्या, असेही लिजान यांनी म्हटले आहे.
कोणत्याही अंतराळ कार्यक्रमांतर्गत जबाबदारीने कार्यवाही करण्यात यावी, असे अंतराळ उद्योगाशी संबंधित करारात स्पष्टपणे नमूद केलेले आहे. या अटींकडे अमेरिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोपही चीनकडून करण्यात आला. अशाप्रकारे अंतराळातील धडक टाळण्यासाठी अमेरिकेकडून काळजी घेतली जावी, असे आवाहनही चीनने केले आहे.