लाखणगांव – लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथील काळ्या नावाच्या कुत्रा व बिबट्या यांच्यातील संघर्षाची थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याची चर्चा सर्वत्र होत असुन तालुक्यात होणारे बिबट्याचे दर्शन नागरीकांमधे भिती निर्माण करत आहे.
लांडेवाडी गावाच्या हद्दीतील अंगणवाडी परिसरात शुक्रवार दि.24 रोजी रात्री 11 च्या सुमारास शेतकरी गणेश मुरलीधर शेवाळे यांच्या काळया नावाच्या कुत्र्यावर सुनिल मारुती शेवाळे यांच्या घरासमोर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने बिबट्यावर प्रतिहल्ला केला.
बिबट्या आणि कुत्रा यांच्यामध्ये पाच मिनिटे झटापट होवुन जोरदार प्रतिकार करत बिबट्याला पळवून लावले. या हल्ल्यात कुत्रा किरकोळ जखमी झाला असून हा सर्व प्रकार तेथीलच काही स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये शूट केला आहे. शूटिंग काढल्यानंतर व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून सगळीकडे या काळ्या नावाच्या कुत्र्याची चर्चा सुरु आहे.
गणेश शेवाळे हे रात्री अकरा वाजता मंचर येथुन घरी आले. त्यानंतर काही वेळाने बाहेर आवाज झाल्याने घरातील व्यक्ती बाहेर आले. त्यावेळी बाहेर बिबट्या व कुत्रा यांची झटापट सुरु होती. लांडेवाडी परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांचे वास्तव्य वाढले आहे.
रात्रीच्या वेळी व दिवसाही बिबट्या दर्शन देत आहे. त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर पिंजरा लावावा व बिबट्याला जेरबंद करावे,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचार्यांनी भेट देवुन पाहणी केली. वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने अँनिडेर हा कॅमेरा टॅप तेथे लावला आहे. बिबट्या आल्याबरोबर कॅमेऱ्यात कैद होऊन सायरन वाजणार आहे. त्यामुळे नागरिक सतर्क होतील. वनकर्मचारी गस्त घालतील, अशी माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी दिली.
खालील लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ
https://fb.watch/a6Wc4pc5NP/