केपटाउन – करोनाचा नवीन प्रकार ओमायक्राॅनचा शोध लावणाऱ्या आणि दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डाॅ. एंजेलिक कोएत्जी यांनी भारतातील ओमायक्राॅनच्या संसर्गाबाबत माहिती दिली आहे. भारतात सुरुवातीच्या टप्प्यात ओमायक्राॅन बाधितांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसेल, मात्र दक्षिण अफ्रिकाप्रमाणे बहुतांश लोकांमध्ये त्याचा प्रभाव कमी प्रमाणात असेल.
तसेच या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लसीकरण आणि कोविड नियमांचे पालन करणे हा एकच पर्याय आपल्याकडे असल्याचे डाॅ. कोएत्जी यांनी सांगितले. ज्या लोकांनी लस घेतलेली नाही त्यांना शंभर टक्के ओमायक्राॅनचा धोका आहे. लस न घेतलेल्या आणि ओमायक्राॅनची लागण झालेल्या 10 पैकी 9 जणांना आयसीयूत दाखल करावे लागले आहे. त्यामुळे लसीकरण फार महत्वाचे असल्याचेही डाॅ. कोएत्जी यांनी सांगितले.
कोएत्झी म्हणाल्या की, ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे किंवा ज्यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे अशा लोकांवर ओमिक्रॉनचा प्रभाव कमी होईल. परंतु ज्यांना याआधी कोरोना झाला नाही किंवा त्यांनी लसीचा कोणताही डोस घेतलेला नाही त्यांच्यात संसर्ग वेगाने पसरतो. तसेच हा विषाणू गरम शरीरावर हल्ला करतो आणि मुलांना देखील संक्रमित करतो. सध्या, ओमायक्राॅन जीवघेणा नाही, परंतु उच्च संसर्गजन्य वेगाने तो पसरत आहे. व्हायरसचा एकमेव उद्देश हा उबदार शरीरात संसर्ग करणे आणि जगणे आहे.