पुणे – समाविष्ट गावातील कर्मचारी भरती प्रकरणात जे दोषीच्या पिंजऱ्यात आले त्यांना जिल्हा परिषदेकडून नोटिसा पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात अप्रत्यक्ष सहभाग असलेल्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या “अप्रत्यक्ष हात’ असलेल्यांकडून संबधितांना संपर्क करून “काय असेल ते आपण बघू, मात्र माझं नाव कुठे आले नाही पाहिजे,’ अशी विनंतीवजा तंबी दिली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये अधिकारी, पदाधिकारी यांचा समावेश आहे.
कर्मचारी भरतीप्रकरणी जिल्हा परिषदेकडून 212 सरपंच आणि सदस्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. तसेच ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांनाही नोटीस पाठवून या प्रकरणात “आपल्यावर कारवाई का करू’ नये अशी विचारणा केली आहे. कोणत्या कलमाखाली आपल्यावर कारवाई होईल हे दर्शविण्यात आले असून, पुढील पंधरा दिवसांत या नोटीसला उत्तर द्यायचे आहे. त्यामुळे ज्यांच्या सांगण्यावरून सरपंच आणि सदस्यांनी कामे केली त्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाघोली, पिसोळी, म्हाळुंगे आणि शेवाळवाडी या गावांत बोगस भरती झाली नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आम्ही सह्या केल्याच नाहीत
अनियमितपणे कर्मचारी भरती केल्याप्रकरणी समाविष्ट गावातील सरपंचासह सदस्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या. त्यामुळे ज्या सदस्यांचा यामध्ये सहभाग नाही, त्यांच्याकडून “आम्ही भरती केलीच नाही,’ सह्याही आम्ही केल्या नाही. मग आम्हाला नोटिसा कसा? असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे सदस्यांच्या खुलासानंतर नक्की भरतीत सहभाग कोणाकोणाचा आहे, हे प्रथमदर्शनी समोर येणार आहे. त्यामुळे ज्याने भरती केली त्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी काही ग्रामपंचायतीतील सदस्य एकत्र आल्याचे दिसून येते.
गावे आणि बोगस भरती
नऱ्हे-96, बावधन-73, मांगडेवाडी- 30 ते 40, खडकवासला 65, कोंढवे धावडे-64, न्यू कोपरे-39, गुजर निंबाळकरवाडी-33, होळकरवाडी-37, मांगडेवाडी-36, जांभुळवाडी- कोळेवाडी 44, वडाचीवाडी 14, नांदेड 21, भिलारेवाडी 15, औताडे हांडेवाडी 28, आणि सूस गाव-41