कराची – कराची शहरातील नारायणपुरा भागातील एका जुन्या हिंदू मंदिरातील मूर्त्यांची तोडफोड केल्याबद्दल पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. वलीद मोहम्मद शब्बीर असे या व्यक्तीचे नाव असल्याचे “एफआयआर’मध्ये म्हटले आहे. त्याच्याविरोधात मुकेश कुमार नावाच्या एका स्थानिक हिंदू व्यक्तीने तक्रार दिली होती.
वलीद याने हातोडीने मंदिरातील मुर्त्यांवर प्रहार केल्याचे मुकेश कुमार आणि त्यांच्या पत्नीने बघितले होते. त्यानंतर इतर स्थानिक नागरिकांनी या समाजकंटकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर हिंदू नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर बसून धरणे आंदोलन केले. हिंदू मंदिरांना संरक्षण देण्याची मागणी यावेळी सरकारकडे करण्यात आली.
मंदिराच्या मुर्त्या भग्न करण्याचा प्रकार घडल्यानंतर या परिसरात आपल्याला सुरक्षित वाटत नसल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या भागात रहाणारे बहुसंख्य मजूर आहेत. मंदिरांवर हल्ला होणे ही दुर्दैवी बाब आहे. आमच्या प्रार्थनास्थळांचे संरक्षण व्हावे, अशी आमची अपेक्षा असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
हा प्रकार घडल्यानंतर पोलीस आणि रेंजर्सचे जवान घटनास्थळी पोहोचले आमि त्यांनी परिसराची पूर्ण नाकाबंदी केली. अशा घटना ताबडतोब थाबल्या पाहिजेत. अशा घटनांमुळे समाजात तणाव निर्माण होतो. त्यामुळे पोलिसांनी त्वरित हालचाली करून दोषींना अटक करावी, अशी सूचना सिंध प्रांताचे अल्पसंख्य मंत्री ग्यानचंद इसरानी यांनी पोलिसांना केली आहे.