मुंबई – आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलीस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसत आहेत. या सर्व घोटळ्यांची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली सोमवारी केली होती. तोच आज पेपरफुटी प्रकरणी भाजपच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटी झाल्याप्रकरणी यापूर्वीच बीड जिल्ह्यात कारवाई झालेली आहे. आता भारतीय जनता युवा मोर्चा पाटोदा माजी अध्यक्ष संजय सानप याला पोलिसांनी अटक केली आहे.
संजय सानप याचा पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभाग आढळून आला आहे. त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. सानप याला 23 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याआधी आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली आहे. आता भाजप नेत्याचा यामध्ये समावेश झाला आहे. आरोपी संजय सानप यांचे बीड जिल्ह्यात वडझरी गाव आहे. या गावात सानपने अनेक मुलांना नोकरीला लावल्याचं सांगण्यात येत.
वास्तविक पाहता, म्हाडा पेपरफुटीमुळे पोलिसांनी तपास सुरू केला होता. मात्र या तपासातच आरोग्य विभागातील पेपरफुटीचे धागेदोरे हाती लागत आहेत. भविष्यात आणखी घोटाळे बाहेर येऊ शकतात, अशी शक्यता पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्त यांनी व्यक्त केली आहे.