ऍडलेड – इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात गुरुवारी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 2 गडी गमावून 221 धावांपर्यंत मजल मारली. मार्नस लेबुशेन व सलामीवीर डेव्हीड वॉर्नर यांच्या दमदार खेळीच्या जोरावर प्रकाशझोतात खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्याच दिवशी वर्चस्व राखले.
ऑस्ट्रेलियाचा बदली कर्णधार स्टिव्हन स्मिथ याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात नियमित कर्णधार पॅट कमिन्स खेळू शकला नाही. करोनाबाधित आका व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्याला या सामन्यात खेळता आले नाही. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली.
सलामीवीर मार्कस हॅरीस 3 धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र, वॉर्नरने लेबुशेनच्या साथीत संघाचा डाव सावरला. या दोघांनी आपापली अर्धशतके थाटात पूर्ण केली. वॉर्नर जास्त आक्रमक खेळत होता. तो शतकाजवळ आल्यावर मात्र, अनावश्यक फटका मारून बाद झाला. त्याने आपल्या 95 धावांच्या खेळीत 167 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार फटकावले. बाद होण्यापूर्वी त्याने लेबुशेनच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 172 धावांची भागीदारी केली. तो बाद झाल्यावर कर्णधार स्मिथने लेबुशेनला सुरेख साथ देत दिवसअखेर संघाला द्विशतकी धावांच्या पुढे मजल मारुन दिली.
लेबुशेन शतकाच्या जवळ आला आहे. त्याने आपल्या नाबाद 95 धावांच्या खेळीत तब्बल 275 चेंडू खेळताना 7 चौकार फटकावले. स्मिथने आपल्या संथ खेळीत 72 चेंडूंचा सामना करताना 2 चौकारांसह नाबाद 18 धावा केल्या. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड व बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 89 षटकांत 2 बाद 221 धावा. (डेव्हीड वॉर्नर 95, मार्नस लेबुशेन खेळत आहे 95, स्टिव्हन स्मिथ खेळत आहे 18, स्टुअर्ट ब्रॉड 1-34, बेन स्टोक्स 1-50).