नवी दिल्ली – भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या देशासमोर क्रिप्टामुळे काही अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे क्रिप्टोचे नियम जागतिक समन्वयाने करण्याची गरज असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य सल्लागार गीता गोपीनाथन यांनी म्हटले आहे.
एका संस्थेने आयोजीत कलेल्या कार्यक्रमात बोलतांना गोपीनाथन म्हणाल्या की, क्रिप्टोचे व्यवहार इंटरनेटवर आधारित असतात. त्याचबरोबर क्रिप्टो एक्सचेंज देशाच्या सीमा न जुमानता जागतिक पातळीवर काम करतात. त्यामुळे कोणा एका देशाला याचे नियमन करणे शक्य नाही. यासाठी या विषयावर जागतिक समन्वयाची गरज आहे.
क्रिप्टोची खरेदी वेगाने विकसित होणाऱ्या देशात जास्त प्रमाणात होत आहे. त्या तुलनेत विकसित देशातील खरेदीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे वेगाने विकसित होणाऱ्या देशांनी अधिक सावध राहून नियमन करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी उप व्यवस्थापकीय संचालक पदावर बढती झाली आहे. त्या सध्या भारत भेटीवर असून काल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आर्थिक विषयावर चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा जागतिक समुदायाला क्रिप्टोचे जागतिक समन्वयाने नियमन करणार करण्याची गरज असल्याची भूमिका मांडली आहे. भारताने क्रिप्टोचे नियमन करण्यासाठी एक विधेयक तयार केले असून या विधेयकावर सध्या राष्ट्रीय पातळीवर चर्चा चालू आहे. हे विधेयक संसदेत सादर करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.