राजगुरूनगर – दारू पिण्यासाठी केवळ वीस रुपये दिले नाही आणि शिवीगाळ म्हणून खरपुडी परिसरात बुधवारी (दि. 15) रात्री रामदास सोपान थिटे (दि. 27, रा. रेटवडी, ता. खेड) या युवकाचा खून करण्यात आला होता. तर त्याच्या मावस भावासही जबर मारहाण केली होती. दरम्यान, या खुनाची गुरुवारी (दि. 16) सकाळी उकल झाल्यानंतर खेड पोलिसांनी खुनातील संशयित आरोपीला आठ तासांच्या आत अटक केली.
नितीन काळूराम काशिद (वय 47 रा. खरपुडी बुद्रुक, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर मयतचा मावस भाऊ दत्तात्रय रामदास टाकळकर (रा. रेटवडी ता. खेड) असे गंभीर जखमी असलेल्याचे नाव आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा खेड पोलीस गुन्हे पथक तपासात रामदास थिटे याचा खून काशिदने केला असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती, त्याचा शोध घेतला असता तो घरातून फोन बंद करून फरार झाला होता. त्याचा आजूबाजूचे गावामध्ये शोध येत असताना तो खेड घाट परिसरात पळून जात असताना त्यास शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे या गुन्ह्याबाबत तपास केला असता त्याने गुन्हा केला असल्याची पोलिसांना कबूली दिली.
नितीन काशिदने मृत थिटे आणि गंभीर जखमी टाकळकरकडे 20 रुपये मागतिले होते. ते त्यांनी न दिल्याने आणि शिवीगाळ केल्याने त्याचा राग मनात धरून काशिदने लाकडी दांडके थिटेच्या डोक्यात घालून त्याचा खून केला आहे. तर टाकळकरच्याही डोक्यात लाकडी दांडके घालून त्यास गंभीर जखमी केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे निरीक्षक सतिशकुमार गुरव, उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हावलदार मोहन अवघडे, संतोष घोलप, सचिन गिलबीले, विजय रहातेकर, बाळकृष्ण साबळे, पोलीस नाईक शेखर भोईर, प्रवीण गेंगजे, पोलीस कॉस्टेबल निखील गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, विशाल कोठावळे, स्वप्नील लोहार, रमेश दाते यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.