पुणे – आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर सेलने लातूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह 5 जणांना अटक केली. यातील आरोपींची संख्या आता 11 वर पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींमध्ये डॉक्टर, शिक्षक, निवृत्त लष्करी जवानांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “लातूर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे (50, रा. योगेश्वरीनगरी, अंबेजोगाई, बीड) डॉ. संदीप जोगदंड (36, रा. एकात्मता कॉलनी, अंबेजोगाई), उद्धव नागरगोजे (36, रा. तितरवणे, शिरूर कासार, बीड), शाम म्हस्के (38, रा. पंचशीलनगर, अंबेजोगाई), राजेंद्र सानप (51, रा. शामनगर, बीड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे. तर यापूर्वी विजय मुऱ्हाडे, अनिल गायकवाड, बबन मुंढे, सुरेश जगताप, संदीप भुतेकर, प्रकाश मिसाळ यांना अटक केली आहे.’
आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार तपास सुरू असताना प्रारंभी मुऱ्हाडे, गायकवाड यांना, त्यानंतर मुंढे, जगताप, भुतेकर व मिसाळ यांना अटक करण्यात आली होती.
तर, सोमवारी रात्री मुख्य प्रशासकीय अधिकारी बडगिरे याच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने त्यांना 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, उपनिरीक्षक अमोल वाघमारे, संदेश कर्णे, नवनाथ जाधव, शिरीष गावडे, प्रसाद पोतदार यांच्या पथकाने ही कारवाई केली
बडगिरे हाच सूत्रधार?
लातूर आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे हाच सूत्रधार असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानेच अंबेजोगाई येथील मनोरुग्णालयातील डॉ. संदीप जोगदंड यांच्याकडून दहा लाख रुपये व शाम म्हस्के यांच्याकडून पाच लाख रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बडगिरे याने प्रश्नपत्रिका कोठून मिळविली, त्याला कोणी मदत केली व या प्रकरणामध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याचा तपास सुरू आहे.