शिक्रापूर – पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील गरुडझेप ऍकॅडमी येथील कॅन्टीनमधील जेवणामध्ये अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली होती. याबाबत तक्रार आल्यानंतर त्याठिकाणी जाऊन संपूर्ण पाहणी व चौकशी केली आहे. त्यानुसार अहवाल बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यानुसार गरुडझेप ऍकॅडमीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी दिली.
पिंपळे जगताप येथे गरुडझेप ऍकॅडमी असून या ठिकाणी शिक्षण घेणारी मुले लाखो रुपये शुल्क भरून या ठिकाणी प्रवेश घेतात. याठिकाणी मुलांच्या जेवण्यासाठी कॅन्टीनची सोय उपलब्ध आहे. दि. 22 नोव्हेंबर रोजी मुले जेवण करत असताना मुलांच्या जेवनातील भाजीमध्ये अळ्या आढळून आल्या. याबाबत मुलांनी पालकांना माहिती दिली. त्यानंतर पालकांनी त्याठिकाणी येत याबाबत शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार केली.
दरम्यान ही बाब अन्न व औषध प्रशासनाच्या अख्यारित येत असल्याने याबाबत अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना कळविण्यात आले. त्यानंतर अन्न औषध प्रशासनाच्या अन्नसुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर ठिकाणी धाव घेत गरुड झेप अकॅडमी येथे पाहणी केली आहे. यावेळी गरुडझेप ऍकॅडमीची सर्वच बाबींची तपासणी करुन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतप्त पालक तुळशीराम थापेकर, संदीप नेहरकर, कैलास डुंबरे यांनी केली.
गरूडझेप ऍकॅडमीबाबत करण्यात आलेली तक्रार खोटी असून त्याबाबत चौकशी झाली आहे. ज्या मुलांची तंबाखू पकडली, ज्या मुलांना ऍकॅडमीमधून बाहेर काढले. त्यांच्या पालकांनी तक्रार केली आहे. सदर बाब ही चौकशी अंती समोर येईलच, आमच्याकडे सातशे मुले असून त्यापैकी फक्त तीनच मुलांनी याबाबत तक्रार केलेली आहे.
– एस. एस. सोनवणे, संचालक गरूडझेप ऍकॅडमी