भंडारा – काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याची हत्या केल्याची घटना घडली होती. त्यामुळे नाशिकमधील भाजपने आक्रमक पावित्रा घेत पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं. आता भंडारा येथून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची घरात घूसून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
हत्या झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याचं नाव दिनेश बांते असून ते भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला गावातील उपसरपंच देखील आहे. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या होणाऱ्या हत्येमुळे राजकारण तापत असताना आता भंडारा येथील घटनेने यात भर पडली आहे.
आरोपींनी रात्री दहाच्या सुमारास बांते यांच्या घरात घुसून धारदार चाकुने त्यांच्यावर सपासप वार केले. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने बांते यांना रुग्ण वाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
घराशेजारी राहणाऱ्या लोकांसोबत असलेल्या जुन्या भांडणातून सूड उगवण्यासाठी ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.