नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीरने दिल्ली पोलिसांकडे ISIS काश्मीरकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणाची माहिती देताना डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान खासदार गौतम गंभीर यांची सुरक्षाही कडक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, असे सांगण्यात आले आहे की, ISIS काश्मीरने काल रात्री 9.30 च्या सुमारास गौतम गंभीरला त्याच्या अधिकृत ई-मेलवर धमकीचा मेल पाठवला आहे. या मेलमध्ये आम्ही तुला (गौतम गंभीर) आणि तुझ्या कुटुंबाला मारून टाकू, अशी धमकी देण्यात आली आहे.
हा ई-मेल मिळाल्यानंतर गंभीरने पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली आहे. आता या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे सोपवण्यात आला आहे. हा खरोखरच धमकीचा मेल आहे की जाणीवपूर्वक कुणाचा खोडसाळपणा आहे, हे सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होईल.