नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आठवड्यात उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते जेवर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमीपूजन करणार आहेत. पंतप्रधानांबरोबर या वेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित असतील. त्यामुळेच या कार्यक्रमा दरम्यान, कडेकोटपणे सुरक्षादेखील ठेवण्यात येत आहे. यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी काही निर्देश जरी केले आहेत. त्यात पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाला काळं मास्क, काळे कपडे किंवा काळी टोपी घालून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जेवर विमानतळाच्या भूमीपूजनानंतर पंतप्रधान मोदी जेवरमध्ये एका सभेला संबोधित करणार आहेत. या सभेसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आलीय. अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, या सभेसाठी कोणत्याही व्यक्तीला काळं मास्क, काळी टोपी आणि काळे कपडे घालून प्रवेश दिला जाणार नाही.
जेवर जिल्ह्यामधील काही स्थानिकांचा या विमानतळाला विरोध आहे. त्यामुळेच हे लोक या कार्यक्रमामध्ये काळा कपडा दाखवून विरोध दर्शवण्याची आणि गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते, असे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. काही स्थानिकांनी विमानतळाचे नाव सम्राट मिहिर भोज असे ठेवण्यात यावे अशी मागणी केली. स्थानिकांचा विरोध आणि या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आलीय.
गौतमबुद्ध नगर पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या भागामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. गौतमबुद्ध पोलीस स्थानकाचे पोलीस अधिक्षक अलोक सिंह हे मागील काही दिवसांपासून सतत या सभेसंदर्भातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत.