नवी दिल्ली – आपली जुनी वाहने भंगरात काढून नवीन वाहने खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरीकांना जादा करसवलती देण्याचा सरकारचा विचार आहे असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. येथील एका प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की बराच काळ वापरात असलेली जुनी वाहने भंगरात काढण्यासाठीची योजना सरकारने जाहीर केली आहे. जुनी वाहने वापरातून काढून टाकल्यास प्रदुषणालाही मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल असे ते म्हणाले.
ते म्हणाले की सरकारच्या स्क्रॅपिंग धोरणामुळे केंद्र व राज्य सरकारांचा जीडीपीही वाढणार आहे. नवीन वाहनासाठीच्या स्क्रॅपिंग पॉलिसीत या वाहनधारकांना कशा जादा करसवलती देता येतील यासाठी आम्ही अर्थमंत्रालाशी चर्चा करीत आहोत असे ते म्हणाले. जुनी वाहने बाद करून नवीन वाहने घेणाऱ्यांना रोड टॅक्स मध्ये 25 टक्के सवलत दिली जाईल.जीएसटी कौन्सिललाही या अनुषंगाने जादा करसवलती देण्याबाबत विनंती केली जाईल असेही त्यांनी सांगितले. या नवीन स्क्रॅपिंग धोरणामुळे केंद्र व राज्य सरकारांना चाळीस हजार कोटींचा जादाचा जीएसटी मिळू शकेल आणि रोजगाराच्याही संधी त्यातून वाढू शकतात असेही त्यांनी म्हटले आहे.
स्क्रॅपिंग धोरणामुळे नवीन वाहनांचा खप 10 ते 12 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षाही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. जुन्या वाहनांमुळे होणारे प्रदुषण ही देशाची मोठी समस्या आहे असे ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात भंगारात काढण्यात आलेल्या जुन्या वाहनांवर प्रक्रिया करणारी किमान तीन ते चार केंद्रे सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे असेही त्यांनी नमूद केले. अशाच एका सेंटरचे आज गडकरी यांच्या हस्ते दिल्लीत उद्घाटन झाले. येत्या दोन वर्षात देशात अशी दोनशे ते तीनशे स्क्रॅपिंग सेंटर्स उभारली जाणार आहेत.